- भावनिक भाषणामुळे तर्कवितर्कांना सुरुवात
बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पदभार स्वीकारून जवळपास अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य बदलीबाबत प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस हुतात्मा दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्यामुळे बदलीच्या शक्यतेबाबत तर्कवितर्काना सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमात ते म्हणाले की, जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.आता पुरे झाले आहे. अनेक व्यक्तींशी कामानिमित्त जवळचे संबंध निर्माण झाले. या काळात अनेकांच्या कामांशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागल्या. मात्र, या काळात निर्माण झालेले ऋणानुबंध कायम स्मरणात राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले प्रशासकीय सेवेत अधिकाऱ्यांची बदली होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. कोणत्याही ठिकाणी बदली झाली, तरी प्रामाणिकपणे सेवा करून देशाचे नाव उज्वल करण्याचे आपले ध्येय कायम राहील,असेही त्यांनी सांगितले. रोशन यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः बेळगाव येथे होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रशासकीय बदल होऊ शकतात.







