- अलारवाड क्रॉस येथील आंदोलनस्थळाची पाहणी
- पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्याकडून नियोजित ठिकाणच्या सुविधांचा आढावा
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून हलगा येथील सुवर्ण विधानसौधमध्ये होणार असल्याने बेळगावमध्ये पोलीस यंत्रणेने बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. अधिवेशन काळात विविध संघटनांकडून होणारी आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक नियोजन केले जात आहे.
राज्याच्या विविध भागांतून शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी अधिवेशनस्थळी येण्याची शक्यता आहे. या काळात संबंधित संघटनांकडून धरणे आंदोलन, निदर्शने तसेच शासनाला निवेदने सादर केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाने आंदोलनांसाठी स्वतंत्र जागा निश्चित केली असून तेथे तात्पुरते मंडप उभारण्याची व्यवस्था केली आहे.
या नियोजित आंदोलनस्थळाची पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी केली. हलगा-मच्छे मार्गावरील अलारवाड क्रॉसजवळ असलेल्या जागेची पाहणी करून त्यांनी उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
आंदोलनासाठी येणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, मंडप उभारणीसाठी जागेचे नियोजन करणे आणि आंदोलनादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
अधिवेशनाच्या काळात मोठ्या संख्येने आंदोलक बेळगावात दाखल होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे. त्यामुळे आंदोलनस्थळाची पूर्वतयारी करण्याबरोबरच संपूर्ण अधिवेशन काळात आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन सुरू आहे.
दहा दिवस चालणारे हिवाळी अधिवेशन शांततेत आणि सुरळीत पार पडावे, तसेच विविध संघटनांच्या आंदोलनांचे योग्य व्यवस्थापन करता यावे, यासाठी पोलीस विभागाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.








