बेळगाव : गणेशपूर-हिंडलगा येथील इम्पोरिया टॉवरमध्ये धनंजय जाधव मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक तसेच मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात श्री मळेकरणी देवस्थान परिसरात आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याला मोठ्या संख्येने हिंदू बांधव-भगिनी उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यासाठी रविवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर पाटील, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगांवकर, प्रदीप पाटील, तिम्माजी मोरे, भुजंग सादगुडे, सिद्धाप्पा हुक्केरी, भरमा गोमानाचे, अनिल पाटील, पंकज घाडी, शडाक्षरी हिरेमठ, सूर्याजी बीर्जे, उमेश पुरी, बाळू भडगावी, अनिल केसरकर यांच्यासह बेळगाव ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मल्लाप्पा बेळगांवकर, मारुती पाटील आणि पंकज घाडी यांनी आपले विचार मांडले. तसेच नारायण पाटील यांनी मेळाव्याच्या आयोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. बेळगाव ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक मिळविणारी प्राजक्ता उत्तम चौगुले, ग्रामीण कन्नड माध्यमात प्रथम आलेली राधिका चंद्रशेखर बंगारी, शहरातील मराठी माध्यमात प्रथम आलेली स्नेहा यल्लाप्पा हीरोजी, इंग्रजी माध्यमात प्रथम आलेली साईशा पवन देसाई, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेली तृप्ती देसाई तसेच राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारी दिव्या प्रदीप देसाई यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सर्व विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या यशामागील अनुभव कथन करत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
समारोपाच्या भाषणात धनंजय जाधव यांनी सामाजिक कार्य, संघटनात्मक एकता आणि समाजातील बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांप्रती त्यांनी आभार व्यक्त करत, समाजकार्याची ही परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि देणगीदारांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








