• सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

आंबोली : आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ रविवारी सकाळी कड्यावरून दोन मोठे दगड कोसळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर असलेल्या सुमारे ५० मीटर उंच कड्यावरून हे दगड अचानक घरंगळत खाली आले. यापैकी एक मोठा दगड रस्त्यालगतचा संरक्षक कठडा आणि लोखंडी रेलिंग तोडत खोल दरीत कोसळला, तर दुसरा दगड रस्त्यावरच अडकून राहिला.

दगड कोसळण्याच्या वेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन किंवा पर्यटक नसल्याने संभाव्य दुर्घटना टळली. अद्याप पावसाळी पर्यटन हंगामाला पूर्णपणे सुरुवात झालेली नसल्याने आणि रविवार असूनही पर्यटकांची गर्दी कमी असल्याने मोठी हानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष गलोली, लक्ष्मण जाडे, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच सावंतवाडी येथील पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरातील कड्यांवरून दगड कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांनी घाटमार्गावरून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.