- पालीसह परिसरात नऊ हत्तींचा संचार; ड्रोनद्वारेही नजर, शेतपिकांच्या नुकसानीची माहिती संकलित
खानापूर : खानापूर वन उपविभागातील विविध भागांत संचार करणाऱ्या हत्तींच्या कळपाला पुन्हा जंगलात हाकलण्यासाठी वन विभागाकडून गेल्या आठवडाभरापासून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. सुमारे नऊ हत्तींचा कळप परिसरात संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे.
बुधवारी मध्यरात्री खानापूरचे सहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद आणि परिक्षेत्र वन अधिकारी सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी हत्तींचा कळप भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळील भातशेतीत असल्याची खातरजमा करण्यात आली.
पाली, हेम्मडगा, अबनाळी, डोंगरगाव आणि शिरोळीवाडा परिसरात हत्तींचा संचार सुरू आहे. या कळपात एकटा हत्ती, दोन लहान पिल्लांसह इतर हत्ती असल्याचे आढळून आले असून, बुधवारी रात्री पाली गावाजवळ सात हत्ती दिसून आले.
हत्तींना जंगलात परतविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी फटाके फोडून तसेच बंदुकीच्या फैरी झाडून त्यांचा पाठलाग करत आहेत. मात्र, हत्ती जंगलात परतण्याऐवजी भातशेतीच्या कडेला फिरत असल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचीही मदत घेतली जात आहे.
भीमगड वन्यजीव अभयारण्यातील पाली गावाजवळ जंगल रस्त्याच्या कडेला हत्तींचा कळप तळ ठोकून असल्याचे दिसताच काही दुचाकीस्वार घाबरून निघून गेले. वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत हत्तींचा कळप तेथून निघून गेला होता.
बेळगाव वन विभागाच्या हद्दीत हत्तींच्या कळपाचा संचार प्रथमच दिसून येत असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद यांनी सांगितले. हत्तींच्या हालचालींवर ड्रोनद्वारे तसेच वन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. भातशेतीत फिरून पिकांचे नुकसान करणाऱ्या हत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती वन विभागाकडून गोळा करण्यात आली आहे.
हळियाळ, कॅसलरॉक, जगलपेठ, तिनईघाट आणि गणेशगुडी वनक्षेत्रातून अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप या भागात आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कळपात लहान पिल्ले असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाच्या निदर्शनास न आणता हत्तींच्या जवळ जाणे, आरडाओरडा करणे किंवा फटाके फोडणे असे प्रकार नागरिकांनी करू नयेत. पिकांच्या नुकसानीची भरपाई वन विभागाकडून देण्यात येणार असून, हत्तींच्या कळपाला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात परतविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी हत्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे डीसीएफ एन. ई. क्रांती यांनी कळविले आहे.








