• मृतांची संख्या सहावर ; एकाच कुटुंबावर काळाचा घाला
  • ऐन गणेशोत्सवात शहरात हळहळ

बेळगाव : ढोरवाडा, चव्हाट गल्ली येथील आग दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाचाही अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय असला तरी दुर्घटनेचे निश्चित कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

गजानन राजाराम धमोणे (वय ५८) आणि त्यांचा मुलगा रोशन गजानन धमोणे (वय २१) अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत. गजानन हे पेंटिंगचे काम करत होते, तर रोशन उद्यमबाग येथील खासगी कारखान्यात काम करीत होता.

सोमवारी मध्यरात्री सुमारे २.३० वाजता शेडवजा घराला आग लागली होती. या दुर्घटनेत गजानन आणि रोशन गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

या दुर्घटनेत यापूर्वी शारदा गजानन धमोणे (वय ४८), प्रिया गजानन धमोणे (वय २७), गंगा गजानन धमोणे (वय २४) आणि भारती राजाराम धमोणे (वय ५०) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. जखमी बाप-लेकाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

या दुर्घटनेमुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. बुधवारी उत्तरीय तपासणीनंतर गजानन आणि रोशन यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या दुर्घटनेमुळे चव्हाट गल्ली परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी सहा जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.