• सुदैवाने जीवितहानी टळली ; वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी

बेळगाव : शहरातील हनुमाननगर येथील कुवेम्पू नगर प्रेस कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी उभी असलेल्या कारवर मोठे झाड कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने, झाड कोसळताना गाडीत किंवा परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

सोमवारी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी, १ जानेवारी रोजी खरेदी करण्यात आलेल्या ह्युंदाई क्रेटा या नवीन कारवर अचानक झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी वाहन पार्क करताना तसेच रस्त्यावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.