• अन्यथा महापालिकेवर भव्य मोर्चा 
  • रमाकांत कोंडुसकर यांचा प्रशासनाला इशारा

बेळगाव : आगामी गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करा; अन्यथा महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक तथा अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोंडुसकर यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, एलअँडटी कंपनीच्या कामकाजासह ई-आस्ती प्रमाणपत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वसुलीवरून प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील अनेक भागांतील खराब रस्त्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, गेल्या चार वर्षांपासून रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप त्यांनी केला. खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या घटना घडत असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजना तसेच उद्यमबाग उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, काही रस्ते दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पुन्हा खराब झाल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

एलअँडटी कंपनीकडून २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहरातील विविध भागांत रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडल्याचे कोंडुसकर म्हणाले. याशिवाय कोणतेही शुल्क आवश्यक नसताना काही भागांत नागरिकांकडून कथितरीत्या पैसे उकळले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ई-आस्ती प्रमाणपत्रासाठी पालिकेला होणारा खर्च कमी असतानाही गरिबांकडून हजारो रुपये घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लहान घरांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना त्रास देणारे अधिकारी मोठ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणांवर मात्र मौन बाळगत असल्याची टीकाही त्यांनी केली.

शास्त्रीनगरातील नागरिकांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याचे कोंडुसकर यांनी सांगितले. मात्र, या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली नाही, तर आंदोलन छेडून महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी पुन्हा दिला.