बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना (बीडीसीए) आयोजित पहिल्या बीडीसीए अखिल भारतीय 1800 खालील फिडे रेटेड क्लासिकल चेस टूर्नामेंट स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि कर्नाटक स्टेट चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने ही बुद्धिबळ स्पर्धा शिवबसव नगर, बेळगाव येथील केपीटीसीएल समुदाय भवनात आयोजित करण्यात आली आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त लाडा मार्टिन, पॉलिहाइड्रॉन फाउंडेशनच्या सीएसआर इन्चार्ज तेजस्विनी कुलकर्णी, ओम असोसिएटचे संचालक रोहन देसाई, बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष दिनेश भिराडे, उपाध्यक्ष बसवराज बागेवाडी, सचिव आकाश मडिवाळर, सहसचिव शगुप्ता खान, खजिनदार दीपक कदम, स्पर्धा संचालक गिरीश बाचीकर स्पर्धा उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

प्रारंभी स्पर्धा आयोजकांनी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केल्यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर पोलीस आयुक्त लाडा मार्टिन यांनी बुद्धिबळ पटावरील सोंगटी हलवून तसेच बाल स्पर्धकांसोबत बुद्धिबळाच्या चार चाली चालवून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विविध गटात ही स्पर्धा घेतली जाणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 3 लाख 24 हजार रुपयांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मुख्य आर्बिटर म्हणून वसंत बी. एच. (आय. ए) तर डेप्युटी आर्बिटर म्हणून आकाश मडिवाळर (एफ.ए) काम पाहणार आहेत. स्पर्धेत विविध ठिकाणच्या बुद्धिबळपटूंनी बहुसंख्येने भाग घेतला आहे.