• चलवेनहट्टीसह परिसरात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

चलवेनहट्टी / मनोहर हुंदरे

अलिकडे शेतीच्या कामासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी पेरणीपूर्व म्हणजे खरीप हंगामाच्या प्रारंभी बैलांच्या साह्याने मशागत करावीच लागते. मान्सून दाखल होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस शेतकरी वर्ग सर्रास आपल्या शेतातील मशागतीत गुंतलेला असतो. पण यंदा अवकाळी पावसाने जोरदार दणका दिल्याने शेतीची अंतिम टप्प्यातील कामे खोळंबली. त्यातच मान्सून जोरदार मुसंडी मारत असल्याच्या हवामान खात्याच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली. पण पावसाने काल पासून उघडीप दिल्याने चलवेनहट्टी, अगसगे हंदिगनूर, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी, बोडकेनट्टी या भागातील शेतकरी झापटून कामाला लागले असून मान्सून दाखल होण्यापूर्वी आपले शेत पेरणीसाठी तयार करण्यात गुंतले आहेत.

ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केलेल्या जमिनीचे सपाटीकरण करणे, बांधावर माती टाकणे, कुळवणी, शेणखत विसकटणे आदि कामे खोळंबली होती पण पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाल्याने शेतीची कामे चांगल्या प्रकारे होत आहेत. तसेच मे महिन्याच्या अखेरीस विहीरी तसेच कूपनलिका तळ गाठतात. त्यामुळे ऊस पिकासह तरकारी पिकांना पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो. पण अवकाळी पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे. तसेच पावसाने किमान पंधरा दिवस उघडीप दिल्यास फायदा होईल असे मत व्यक्त शेतकरी वर्गातून‌ होत आहे.