बेळगाव / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हरितसेना यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील सुवर्णसौधसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील तसेच आसपासच्या भागातील हजारो शेतकऱ्यांनी यात सहभाग घेत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनावेळी शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी अनेक मागण्या मांडल्या. त्यांनी सांगितले की, शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत, वनक्षेत्राजवळील शेतकऱ्यांचे संरक्षण करावे, गावातील रस्त्यांची तात्काळ सुधारणा करावी, वनजमिनीवरील अतिक्रमण कायद्यात आवश्यक बदल करावेत. तसेच केपीटीसीएल स्टेशनसाठी जमीन देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करावी, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, ‘अवैध–वैध’ योजना सुरू करावी, दूधाचा दर प्रति लिटर १०० रुपये घोषित करावा आणि मका खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.
दरम्यान, एपीएमसी व साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून शाश्वत तोडगा नक्की काढला जाईल. सावरवाडीतील ऊस जाळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गुरलापूरचे आंदोलन शेतकऱ्यांची ताकद दाखवणारे होते,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर भाष्य करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी १० वर्षे पदावर राहोत, पण शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळालाच पाहिजे,” अशीही मागणी व्यक्त केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे सुवर्णसौध परिसर दिवसभर गजबजलेला होता.








