- ६.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक
बेळगाव : देसुर गावातील हॉटपॉट ढाब्याजवळ अवैधपणे पेट्रोल आणि डिझेल साठवून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. या कारवाईत ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ सप्टेंबर २०२६ रोजी सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमननगर येथील तमीम हसनसाब यरगट्टी आणि वैभव नगर येथील साकिब शमीम अन्सारी यांचा समावेश आहे. फरार असलेला इस्रार मुल्ला (टी.व्ही. सेंटर, हनुमाननगर) याच्या सूचनेनुसार आरोपी अवैध नफ्यासाठी कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेता इंधन साठवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी ९०० लिटर पेट्रोलचे पाच बॅरल, किंमत ९९ हजार रुपये, तसेच ९०० लिटर डिझेलचे पाच बॅरल, किंमत ९० हजार रुपये, जप्त केले. याशिवाय इंधनाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे अशोक लेलँड मालवाहू वाहन (KA-22/AA/7460) ताब्यात घेण्यात आले आहे.
साठवलेले इंधन अन्यत्र विक्रीसाठी घेऊन जात असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पी.क्र. २१५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अत्यावश्यक वस्तू कायदा, पेट्रोलियम कायदा आणि बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.








