• मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, चेन्नईसह अनेक प्रमुख शहरे हाय-स्पीड रेल्वेने जोडली जाणार

नवी दिल्ली : देशात हाय-स्पीड रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने आणखी सात नवीन बुलेट ट्रेन मार्गांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच आता देशातील महत्त्वाच्या आर्थिक, औद्योगिक आणि तांत्रिक शहरांना जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर विकसित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दिल्ली, वाराणसी, पुणे, हैदराबाद, बंगळूरु आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांदरम्यान जलदगती रेल्वेसेवा सुरू करण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. देशातील प्रवासाचा कालावधी कमी करणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वे मार्गांमध्ये मुंबई–पुणे, पुणे–हैदराबाद, हैदराबाद–बंगळूरु, हैदराबाद–चेन्नई, चेन्नई–बंगळूरु, दिल्ली–वाराणसी आणि वाराणसी–सिलीगुडी या कॉरिडॉरचा समावेश आहे. या मार्गांमुळे देशाच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये दळणवळण अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असून त्याचे काम सध्या विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. या अनुभवाच्या आधारे इतर कॉरिडॉर विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन सुरू केले आहे.

दरम्यान, नव्या बुलेट ट्रेन मार्गांच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी अद्याप कोणतीही निश्चित कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी व्यवहार्यता अहवाल, प्रशासकीय मंजुरी, निधी उभारणी तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरच संबंधित मार्गांवरील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.