खानापूर : तालुक्यातील चिक्कअंग्रोळी गावात शाळकरी मुलांसोबत कथित भेदभाव झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी येत्या २९ जून रोजी बीडी होबळी चौकात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संबंधितांवर अद्याप कारवाई न झाल्याने संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खानापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत डीएसएसचे जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २३ जून रोजी चिक्कअंग्रोळी गावात एका धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद वाटपा दरम्यान शाळकरी मुलांसोबत कथित भेदभाव झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊनही संशयितांवर तत्काळ कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत, संबंधितांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी बीडी होबळी वर्तुळ परिसरात शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवावी, असे आवाहनही संघटनांकडून करण्यात आले आहे. या आंदोलनात विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला शरद होननायक, रायप्पा चलवादी, राघवेंद्र चलवादी, ईरप्पा मादर, महांतेश पात्रदार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








