- शिवभक्त व जनसामान्यांच्या मागणीनुसार निर्णय
बेळगाव : शिवजयंती उत्सवानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळातर्फे यंदा एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवभक्त व जनसामान्यांच्या मागणीनुसार, छत्रपती शिवरायांचा वैभवशाली सजीव देखावा यावर्षी एकाच ठिकाणी सादर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
मिरवणुकीदरम्यान फिरता देखावा सादर करण्याऐवजी, संयुक्त महाराष्ट्र चौक येथे हा देखावा सतत सादर केला जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शिवरायांच्या इतिहासाचे जिवंत दर्शन घडवणारे देखावे येथे पाहायला मिळणार आहेत.
या उपक्रमामुळे शिवभक्तांना एकाच ठिकाणी शांततेत आणि सविस्तरपणे देखावे अनुभवता येणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रोहन जाधव, उपाध्यक्ष भरत काळगे, चिटणीस मारुती सुतार, खजिनदार आकाश धुराजी, माजी अध्यक्ष मोहन किल्लेकर तसेच गल्लीतले पंच प्रताप मोहिते आणि उत्तम नाकाडी यांनी हे आवाहन केले आहे.








