- साजिद शेख आणि सहकाऱ्यांकडून धारकऱ्यांचे स्वागत
- फळांचे वाटप करून दिला सामाजिक सलोख्याचा संदेश
बेळगाव : श्री दुर्गामाता दौडीच्या दुसऱ्या दिवशी बेळगावातील कॅम्प परिसरात धार्मिक उत्साहासोबतच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. माजी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष साजिद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दौडीतील धारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना फळांचे वाटप केले.
कॅम्प परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजिद शेख यांनी धारकऱ्यांचे आपुलकीने स्वागत केले. विविध धर्मीयांमध्ये परस्पर आदर, बंधुभाव आणि एकोपा टिकून राहावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होण्यास अशा उपक्रमांची मदत होते.

यावेळी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार, ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय आणि डेप्युटी कमांडंट विनोद पाटील उपस्थित होते. साजिद शेख, सतीश मनुरकर, डॉ. राहिला शेख, अझीझ अब्बासअली यांच्यासह अन्य मान्यवरांनीही या स्वागत उपक्रमात सहभाग घेतला.
श्री दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने कॅम्प परिसरात अनुभवायला मिळालेल्या या सलोख्याच्या वातावरणातून बेळगावातील सामाजिक एकतेची भावना अधोरेखित झाली.








