- अथणी पोलिसांची कारवाई ; लाखो रुपयांचे सोने जप्त
अथणी : बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महिलांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अथणी बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला. अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख हेमा कसबेकर आणि नीलम कांबळे अशी झाली असून त्या महाराष्ट्रातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात या महिला बसमध्ये चढताना किंवा उतरताना होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि गोंधळ याचा फायदा घेत महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास करत असल्याचे समोर आले. प्रवासी असल्याचे भासवत त्या चोरी करून कोणालाही संशय न येऊ देता पसार होत असत.
कसून चौकशीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चार मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ६८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती दिली.
या कारवाईमुळे अथणी परिसरातील प्रवासी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, चातुर्याने तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या अथणी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.








