• संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

बेळगाव : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने मोबाईल शोरूममध्ये प्रवेश केलेल्या एका व्यक्तीने ग्राहकाचे सोंग घेत तब्बल दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल लंपास केल्याची घटना बेळगावात उघडकीस आली आहे. दुकान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून करण्यात आलेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

गोवावेस चौकाजवळील एअरटेल कार्यालयाशेजारी असलेल्या एका मोबाईल शोरूममध्ये भिक्षुकाच्या वेशातील एक व्यक्ती मोबाईल पाहण्याच्या बहाण्याने दाखल झाला. काउंटरवरील मोबाईल पाहत असताना त्याने संधी साधून कर्मचाऱ्यांची नजर चुकवत दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल खिशात ठेवला.

त्यानंतर बिलिंग काउंटरकडे जात असल्याचा आव आणत त्याने कोणालाही संशय न येऊ देता दुकानातून पलायन केले. काही वेळाने काउंटरवरील मोबाईल दिसत नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून आला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोरूम व्यवस्थापनाने बेळगावच्या टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.