• ग्रामपंचायतीला निवेदन सादर

येळ्ळूर :  शिवारातील शेतरस्त्यांची झालेली दुरवस्था तातडीने दूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने ग्रामपंचायतीकडे केली आहे. पेरणी व इतर शेतीची कामे सुरू असल्याने खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समितीने निवेदनातून नमूद केले.

यासंदर्भातील निवेदन ग्रामपंचायतीचे सचिव सदानंद मराठे यांना सादर करण्यात आले. शेतरस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीबरोबरच गावातील पिण्याच्या पाण्याच्या गोडी विहीर, माणग्याची विहीर, बाराभाव विहीर आणि इंदिरानगर येथील विहिरींमध्ये नियमित ब्लिचिंग पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच लक्ष्मी तलाव, फुटूक तलाव आणि मंगाई तलावात पावसाचे पाणी वळवून साठवणूक करण्याची, पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी गटारींची तातडीने साफसफाई करण्याची आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय शिवाजी विद्यालयासमोरील जीर्ण व धोकादायक वृक्ष तातडीने हटवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणीही समितीने ग्रामपंचायतीकडे केली आहे.

निवेदन सादर करताना येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सचिव प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेंद्र पाखरे, सुरज गोरल, यलुप्पा पाटील, शिवाजी कदम, शिवाजी पाटील, रमेश धामणेकर, नेताजी गोरल, सतीश देसूरकर, बाळकृष्ण पाटील, प्रकाश सायनेकर, शिवाजी गोरल, कृष्णा शहापूरकर, भरमाण्णा मंगणाकर, भुजंग संभाजी यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.