बेळगाव / प्रतिनिधी
रताळ्याची वेल काढायला गेलेल्या शेतकऱ्याला सापाने दंश केल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावात घडली आहे. या घटनेत रवींद्र शिवाजी कांबळे (वय ३८) असे या युवा दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. रवींद्र हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामावर गेला होता. शेतात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रताळ्याच्या वेली तोडत असताना खाली दडलेल्या सापाने रवींद्रच्या हाताला दोनदा डंख मारला. रवींद्रला सापाने चावल्याचे लक्षात येताच उपचारासाठी तातडीने त्याला बेळगाव बिम्स रुग्णालयात नेत असताना दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रवींद्र याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
मयत रवींद्र यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि भाऊ असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून बेळगाव तालुक्यात सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने देखील याबाबत जागृतीचे आवाहन केले आहे.