- रमी क्लबमधील गोळीबाराचा तपास वेगात ; उर्वरित संशयितांचा शोध सुरू
बेळगाव : शहरातील युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून, पुणे येथून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. रोहन असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरू असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारचीही माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
मंगळवारी (१४ जुलै) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावर असलेल्या युनियन जिमखाना परिसरातील रमी क्लबमध्ये कारमधून आलेल्या काही बंदूकधारी तरुणांनी प्रवेश केला. त्यांनी क्लबमधील काही जणांना धमकावल्यानंतर हवेत गोळीबार केला. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत एक जिवंत काडतूसही घटनास्थळी पडले होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे क्लबमधील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, कॅम्प पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पुरावे संकलित केले.
तपासादरम्यान गोळीबार करणारे संशयित मराठी भाषेत संवाद साधत असल्याची माहिती समोर आल्याने त्यांचा महाराष्ट्राशी संबंध असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानुसार पुणे येथे कारवाई करून एका संशयिताला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.








