• फुटबॉल प्रशिक्षणासह शालेय शिक्षणाची सुवर्णसंधी

बेळगाव : शहापूर येथील गाडेमार्ग परिसरातील होतकरू फुटबॉलपटू अवनीश अनिल माळवी याची बंगळुरू येथील सेंट अलॉयसिस स्कूलमध्ये संपूर्ण फुटबॉल प्रशिक्षण आणि शालेय शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अवनीश यापूर्वी बेळगावातील ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या उत्कृष्ट फुटबॉल कौशल्याची दखल घेत टेक्निको बेळगाव ट्रायल्स क्लबच्या माध्यमातून विविध निवड चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्याने प्रभावी कामगिरी करत गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर त्याची सेंट अलॉयसिस स्कूलमध्ये नववीच्या वर्गासाठी निवड करण्यात आली.

या निवडीमुळे अवनीशला दर्जेदार शालेय शिक्षणासोबतच अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. माध्यमिक तसेच पुढील महाविद्यालयीन शिक्षणही तो बंगळुरू येथेच पूर्ण करणार असून, फुटबॉल क्षेत्रात प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षण त्याला उपलब्ध होणार आहे.

सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अवनीशने हे यश मिळविले आहे. त्याच्या या प्रवासात फुटबॉल असोसिएशन, राज्यस्तरीय अधिकारी, प्रशिक्षक तसेच टेक्निको बेळगाव ट्रायल्स क्लब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

अवनीशच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो राज्य आणि देशाचे फुटबॉल क्षेत्रात प्रतिनिधित्व करून बेळगावचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.