- सुरक्षेसाठी २२०० पोलीसांचा ताफा तैनात
- ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे सर्वत्र करडी नजर
बेळगाव : बेळगावात आज मंगळवारी पारंपारिक शिवजयंती मिरवणूक संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी शहरात तब्बल २२०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. तसेच शिवाजी जयंती सोहळ्याचा एक भाग म्हणून, विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बंदोबस्ताबाबत योग्य मार्गदर्शन केले.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले, शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके वाहतूक विभाग, गुन्हे शाखा तसेच तणाव नियंत्रण पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत.
मिरवणूक मार्गा बरोबरच शहरात कोणताही अनुचित प्रकार घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. मिरवणूक मार्ग व शहरातील विविध महत्त्वाचे चौक याठिकाणी एक हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय दहा ड्रोनची नजर मिरवणुकीवर असणार आहे. तसेच १४ के एसआरपीच्या तुकड्या आणि आठ राखीव दलाच्या तुकड्या मिरवणुकीच्या मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. अन्य पोलीस ताफा मिळून एकूण २२०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत.मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नाही पोलीस आयुक्त बोरसे यांनी केले.








