- जिल्ह्यात १०० टक्के अर्ज वाटप पूर्ण ; डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्याकडे
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग आला असून, सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्ज वाटपाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती देत प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची आणि मतदान केंद्राची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील एकूण ४१.०७ लाख मतदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन अर्ज आणि स्टिकर्सचे वितरण करत असून, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांची माहिती संकलित केली जात आहे.
मतदार यादीच्या डिजिटायझेशनचे कामही वेगाने सुरू असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७६ टक्के माहिती ऑनलाइन करण्यात आली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात ६० टक्के, तर उत्तर मतदारसंघात ५१ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. बीएलओ सुविधा केंद्रांवर प्राप्त होणारे अर्ज तातडीने ऑनलाइन नोंदवले जात असून, आवश्यक असल्यास अंतिम मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी आणखी एक आठवड्याचा अवधी दिला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जे मतदार अर्ज वितरणावेळी घरी उपलब्ध नव्हते किंवा ज्यांचे निवासस्थान बदलले आहे, तसेच मतदान केंद्राबाबत माहिती हवी आहे, त्यांनी आपल्या परिसरातील बीएलओशी संपर्क साधावा. प्रत्येक मतदान केंद्राला ‘बीएलओ सुविधा केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून, नागरिकांना तेथे जाऊन आवश्यक अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची यादी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीत एखादी त्रुटी आढळल्यास किंवा जिवंत असलेल्या व्यक्तीची नोंद चुकून मृत म्हणून झाल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.








