- आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त विविध संस्थांचा सहभाग
बेळगाव : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करीविरोधी दिनानिमित्त बेळगाव शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभाग, बेळगाव जिल्हा औषध विक्रेते संघ, केएलई संस्था आणि जितो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवन येथून रॅलीला प्रारंभ झाला. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही जनजागृती फेरी केएलई सेंटेनरी कन्व्हेन्शन सेंटर येथे समाप्त झाली.
रॅलीमध्ये विविध फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थी, औषध विक्रेते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींकडून मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी घोषणाबाजी करण्यात आली तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
यावेळी बोलताना डीसीपी नारायण बरमणी यांनी अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीवरही होत असल्याचे सांगितले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून सकारात्मक आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
औषध विक्रेत्यांच्या वतीने नारायण कुलकर्णी आणि संजय कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच बीडीआरपीएचे अध्यक्ष बी. बी. सदलगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








