बेळगाव : शहरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या चार तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीत या चौघांनी गांजासह अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मार्केट आणि माळमारुती पोलिसांनी स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
२६ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी चार तरुण गैरवर्तन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले.
छत्रपती शिवाजीनगर येथील पहिल्या क्रॉसजवळ अभिजीत भरमा पाटील (वय २३, रा. शिवाजीनगर) आणि चौथ्या क्रॉसजवळ सिद्धार्थ दत्ता कदम (वय २४, रा. शिवाजीनगर) हे दोघे आढळून आले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात अनुक्रमे गुन्हा क्रमांक २६७/२०२६ आणि २६८/२०२६ दाखल करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, महांतेशनगर येथील ग्लास हाऊसजवळ मोहम्मद अर्सलान अनीसहमद बागलकोटे (वय १९, रा. वीरभद्रनगर, बेळगाव) आणि अशोकनगर येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ गफरान उर्फ अशपाक अन्सार तेंगिनकेरी (वय २०, रा. न्यू गांधीनगर, बेळगाव) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५८/२०२६ आणि २५९/२०२६ नोंदविण्यात आले आहेत.
या चारही तरुणांविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्याच्या (एनडीपीएस) कलम २७(ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








