बेळगाव : शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेने ‘ऑपरेशन बॅनर’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, विविध भागांत धडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवरील अतिक्रमण हटवल्यानंतर आता प्रशासनाने विनापरवाना लावलेल्या फलकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर पाहणी करत मुदत संपलेले तसेच नियमबाह्य पद्धतीने लावलेले बॅनर काढून टाकले. राणी चन्नम्मा चौक, डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, क्लब रोड आणि कोल्हापूर चौक या वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करून फलक जप्त करण्यात आले.
या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. शहरात स्वच्छता आणि सुसूत्रता राखण्यासाठी ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू ठेवली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन बॅनर’चे नागरिकांनी स्वागत केले असून, शहराचे सौंदर्य जपण्यासाठी अशा कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.








