• शैक्षणिक समस्या मांडल्या ; अनुदानित शाळांच्या प्रश्नांवर चर्चा
  • प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या विविध समस्या मांडल्या. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

भेटीदरम्यान शिक्षकांच्या वतीने शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा अनुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. मठद, मलगौडा, ईश्वर बिरादार (मुडलगी), बसवराज कुकडोळी आणि पी. डी. पाटील उपस्थित होते.

शिक्षकांनी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि प्रलंबित मागण्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मधु बंगारप्पा यांनी १९९५ ते २००० या कालावधीत सुरू झालेल्या विनाअनुदानित शाळांना लवकरच अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले. तसेच रखडलेल्या शाळा नूतनीकरणाच्या कामांनाही लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

याशिवाय २०१६ ते २०२० या कालावधीतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.

या भेटीप्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातील सहशिक्षक एम. पी. कंग्राळकर, एम. एम. मंत्रेशी, जी. एन. नाकाडी आणि रोहित पाटील यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.