बेळगुंदी : श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी, बेळगुंदी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे २१ वे मराठी साहित्य संमेलन येत्या रविवार, दिनांक २४ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच अकादमीची महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीत संमेलनाच्या रूपरेषेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे साहित्य संमेलन एकूण चार सत्रांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये मान्यवरांचे अध्यक्षीय भाषण, वैविध्यपूर्ण विषयांवरील व्याख्याने, नामांकित कथाकथनकारांचे कथाकथन, हास्य-विनोदी कलाकारांचे सादरीकरण आणि बहारदार कविसंमेलन अशा विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. नाना कंग्राळकर होते. प्रारंभी श्री. विलासराव हुबळीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. भाऊराव काकतीकर यांनी अकादमीच्या आजवरच्या वाटचालीचा आणि कार्याचा सविस्तर आढावा सादर केला.
या बैठकीस अकादमीचे सदस्य सर्वश्री बाळू शहापूरकर, सुधा कंग्राळकर, रेणुका कंग्राळकर, प्रकाश किणयेकर, गौरी हलगेकर आणि भावना दातार अकादमीचे सदस्य , शिक्षण प्रेमी ,रसिक आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या शेवटी श्री. कपिल दातार यांनी आभार व वंदनार्पण केले.
पंचक्रोशीतील साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.








