- वन वे नियमांची कठोर अंमलबजावणी होणार
- रिक्षांमध्ये आता क्यूआर कोडची सुरक्षा
बेळगाव : बेळगाव शहरात वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी वन वे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.
माळमारुती पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल राबवले जात असल्याची माहिती दिली. रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी वन वे व्यवस्थेला सहमती दर्शवली असून, मध्यवर्ती बसस्थानक, चन्नम्मा चौक आणि न्यायालय परिसरात पार्किंग शिस्तीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील रिक्षा सेवेला सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक रिक्षात चालक व मालकाचा तपशील असलेला क्यूआर कोड बसवला जाणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर रिक्षाचा प्रवास मार्ग ट्रॅक करता येणार आहे. सुमारे १० हजार अधिकृत रिक्षांना ही व्यवस्था लागू केली जाणार आहे.
तसेच, नोंदणी नसलेल्या सुमारे २ हजार रिक्षांना अधिकृत प्रवाहात आणण्यासाठी ओळखपत्रे देण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही संपूर्ण प्रणाली प्रायोजकांच्या मदतीने विनामूल्य राबवली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.








