- बीम्समध्ये उपचार सुरू
बेळगाव : जमिनीच्या बिगरशेती रूपांतरण (एनए) प्रकरणातून त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने गुरुवारी प्रादेशिक आयुक्त कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय अमीनाभविमठ (वय ५०) यांनी दोन एकर जमिनीच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना विविध कार्यालयांमध्ये पाठपुरावा करावा लागत होता. हावेरी डीसी कार्यालयातून ‘जमिनीची अदलाबदल झाल्याशिवाय नोंदणी होऊ शकत नाही’ असे सांगण्यात आले होते. याच संदर्भात ते वारंवार बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात येत होते.

गुरुवारी ते पुन्हा प्रादेशिक आयुक्त जानकी यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचे कळताच त्यांनी संतापाच्या भरात कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेनंतर त्यांना तात्काळ बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.








