• ३५.८८ लाख नागरिकांचा सहभाग
  • जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

बेळगाव : भारतीय निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यातील एकूण ४१,०७,००० मतदारांपैकी ३५,८८,७५९ मतदारांचे गणना अर्ज संकलित करून त्यांचे डिजिटायझेशन आणि पडताळणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ५,१३,७८६ मतदार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा बनावट असल्याच्या प्राथमिक नोंदी एएसडीडी यादीत करण्यात आल्या असून, त्याची पडताळणी बीएलओमार्फत तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रलंबित असलेल्या ४,४५५ प्रकरणांचे डिजिटायझेशन तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच मतदार यादीतील नावांची जुळवणी आणि दुरुस्तीची प्रक्रियाही वेगाने सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी मतदार यादीत सुमारे ४.५ लाख त्रुटी होत्या. त्या आता २.१२ लाखांपर्यंत कमी करण्यात यश आले असून, जिल्ह्यातील त्रुटींचे प्रमाण ५.१७ टक्के इतके आहे. हे प्रमाण राज्यातील सर्वात कमी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

नावांतील स्पेलिंग, जुळवणी आणि इतर तांत्रिक त्रुटींची पडताळणी करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात येत असून चौकशी सुरू आहे. ही प्रक्रिया मतदारांची नावे वगळण्यासाठी नसून, मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.