बेळगाव : वाल्मिकी विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आणि मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता भाजप कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
भाजप कार्यकर्ते राणी चन्नम्मा चौकात एकत्र आल्यानंतर त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून संताप व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची तसेच झटापट झाली.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी, वाल्मिकी विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण दडपण्यासाठी मंत्री बी. नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनादरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दस्तगौडर, अनिल बेनके यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.








