बेळगाव : बेळगाव येथील केएलएस गोगटे प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत तीन विजेतेपदे पटकावली. बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कॉलेजच्या खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली.
पीयू विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये गोगटे पीयू कॉलेजच्या संघांनी सहभाग घेतला होता. सांघिक खेळ, उत्कृष्ट कौशल्य आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कॉलेजने एकाच दिवशी तीन विजेतेपदांवर आपले नाव कोरले.
शटल बॅडमिंटनच्या मुलांच्या तसेच मुलींच्या दोन्ही गटांत गोगटे पीयू कॉलेजच्या संघांनी प्रथम क्रमांक मिळवला. यासोबतच टेबल टेनिसच्या मुलांच्या गटातही कॉलेजच्या संघाने विजेतेपद पटकावले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कॉलेज व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या खेळाडूंचे तसेच क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.







