बेळगाव : जयपूर येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडी हिने उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना दिशाने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली.
४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात कर्नाटक संघाकडून सहभागी होत दिशाने सुवर्णपदक मिळवले. तसेच ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये २८ सेकंदांची वेळ नोंदवत आणि १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ८ सेकंदांची वेळ नोंदवत तिने दोन रौप्य पदकांवर आपले नाव कोरले.
दिशा सध्या भुवनेश्वर येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या क्रीडा कारकिर्दीत वडील राजेश, आई श्वेता, हिंद स्पोर्ट्स क्लब आणि एनआयएस प्रशिक्षक विश्वनाथ पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
दिशाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








