- येळ्ळूर आणि हिंडलगा येथे कारवाई
- ७,७०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी कारवाई करत येळ्ळूर आणि हिंडलगा येथे छापे टाकले. सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ हजार ७०० रुपये रोख आणि जुगारासाठी वापरले जाणारे ओसी कार्ड जप्त करण्यात आले आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दलवाई आणि बी. डी. सरनाई यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आकड्यांवर पैसे लावून मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपावरून नागेश मारुती भोगले आणि श्याम बबनदास गुलाबानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. अवैध जुगाराविरोधात केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पीएसआय तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.








