- आई-वडिलांच्या स्मरणार्थ कुणाल पाटील यांचा पुढाकार
- ग्रामस्थांना मिळणार उन्हापावसापासून दिलासा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने निवारा शेड उभारण्यात येणार आहे. कुणाल पाटील यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हे शेड बांधून देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ग्रामस्थांच्या पुढाकारातून २० फूट बाय ३० फूट आकाराच्या शेडच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
चलवेनहट्टी येथे तीन ते चार वर्षांपूर्वी नवीन स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सरकारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी अंत्यविधीही सुरू झाले. मात्र, निवारा शेड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. स्मशानभूमीत झाडे नसल्यामुळे उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत असे, तर पावसाळ्यात पावसात भिजत अंत्यविधी पार पाडण्याची वेळ येत होती. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड आणि शेगडीची व्यवस्था अलीकडेच करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी कुणाल पाटील यांच्या आईचे निधन झाले. बालपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या कुणाल यांच्यावर आईच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगात अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वतःच्या दुःखातून सावरल्यानंतर इतर ग्रामस्थांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, या भावनेतून त्यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ निवारा शेड उभारून देण्याचा निर्णय घेतला.
ग्रामस्थांच्या सहकार्याने शेडसाठी जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मनोहर हुंदरे यांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले. या निवारा शेडमुळे भविष्यात अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना उन्हापासून आणि पावसापासून दिलासा मिळणार आहे.
यावेळी विठ्ठल कलखांबकर, लक्ष्मण बडवाण्णाचे, यल्लाप्पा हुंदरे, नारायण पाटील, यल्लाप्पा किटवाडकर, अमोल बडवाण्णाचे, किरण पाटील, युवराज पाटील, राजू हुंदरे, उमेश पाटील आणि गजानन बडवाण्णाचे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.








