बेळगाव / प्रतिनिधी

पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसार शहरात अँटिस्टॅबिंग स्क्वॉडने कामकाजाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी या पथकाने सीबीटी, रेल्वे स्टेशनसह गर्दीच्या ठिकाणी जाऊन संशयास्पद तरुणांच्या बॅगांची तपासणी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी सीबीटीत बसमध्ये विंडो सीट पकडण्याच्या वादातून एका तरुणावर दोघा अल्पवयीन युवकांनी चाकूहल्ला केला. हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी अँटिस्टॅबिंग स्क्वॉड सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली.

शुक्रवारी या पथकाने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. कायदा व सुव्यवस्था शाखेचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली हे पथक शहरात र्सवत्र फिरत होते. सीबीटी, रेल्वे स्थानक परिसरात येणारे-जाणारे विद्यार्थी, तरुण व अन्य प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत होती. हावभाव व पेहरावावरुन संशय येणाऱ्यांना थांबवून त्यांच्या बॅगा तपासल्या जात होत्या. कुणाच्या बॅगेत चाकू, जांबिया अथवा शरीराला इजा पोचवणारी शस्त्रे असतील तर ती ताब्यात घेतली जात होती. काही तरुणांनी हातात घातले जाणारे लोखंडी कडे बॅगेत ठेवल्याचे आढळून आले. याबाबतही पोलिसांनी विचारणा केली. सीबीटी परिसरात मार्केटचे निरीक्षक महांतेश धामण्णवर यांनी पथकाला सहकार्य केले. रेल्वे स्थानकावर पथकासोबत पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर व अन्य सहकारीही दिसून आले.