• पत्नी आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात : खडकलाट पोलिसांची कारवाई
  • सहा महिन्यांनंतर हत्येचा उलगडा

चिक्कोडी : तालुक्यातील खडकलाट येथे अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकलाट पोलिसांनी मृताची पत्नी बंगारी गावडे आणि तिचा प्रियकर रामा रानगे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मृताची ओळख रघु गावडे (वय ४०) अशी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघु गावडे यांची पत्नी बंगारी ही रोजंदारीचे काम तसेच मेंढपाळ म्हणून काम करत होती. तिचे रामा रानगे याच्यासोबत संबंध होते. या संबंधांना रघुचा विरोध असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

कटानुसार रघु याला शेतात बोलावून बंगारी आणि रामा यांनी मिळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून रघु मेंढ्या चारण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याचे भासवण्यात आले. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनीही बंगारीच्या सांगण्यावर विश्वास ठेवला.

दरम्यान, रघु सहा महिन्यांपासून बेपत्ता असतानाही त्याचा शोध लागला नाही. मात्र, रघुचा भाऊ लगमान्ना याला बंगारीच्या सांगण्यावर संशय निर्माण झाला. त्याने ही बाब गावातील जेष्ठ व्यक्तींच्या निदर्शनास आणून दिली.

गावातील वडीलधाऱ्यांनी बंगारीची चौकशी केल्यानंतर तिने अखेर रघुच्या हत्येची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर लगमन्नाने खडकलाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बंगारी गावडे आणि रामा रानगे यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकलाट पोलीस करत आहेत.