• मंदिराकडे ८९ किलो ८४२ ग्रॅम सोने ; ३७४ किलोहून अधिक चांदीची नोंद

बेळगाव : धर्मादाय खात्याच्या अखत्यारितील जिल्ह्यातील मंदिरांचे उत्पन्न, खर्च, बचत तसेच सोने-चांदी आणि मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमुळे अनेक मंदिरांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सौंदत्ती तालुक्यातील श्री रेणुका यल्लमा मंदिर उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंदिराला तब्बल ३१.३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापैकी १८.६५ कोटी रुपये विविध कामांसाठी खर्च झाले असून, मंदिराकडे १२.६५ कोटी रुपयांची निव्वळ बचत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंदिराच्या सोने-चांदीच्या साठ्याचाही तपशील नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार मंदिराकडे सुमारे ८९ किलो ८४२ ग्रॅम १५ मिलिग्रॅम सोने, तर ३७४ किलो ५८७ ग्रॅम १७५ मिलिग्रॅम चांदी असल्याची नोंद आहे.

भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिराला दरवर्षी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. त्यामुळे मंदिराचे उत्पन्न आणि धार्मिक संस्थांकडील मालमत्तेचा तपशील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.