- पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेळगाव : अमन नगर येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या एका तासात सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
५ मे २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वादातून ही घटना घडली. आरोपी हुसेन आणि जावेद यांच्यासह आठ जणांच्या गटाने मजीद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अमन नगर येथील वली शेख, इमाम शेख आणि मजीद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बीआयएमएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून माळमारुती पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या एका तासात सहा आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तलवारीसारखी घातक शस्त्रे वापरणाऱ्यांविरुद्ध ‘रौडी शीट’ उघडण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.








