- आमदार राजू सेठ यांचे आश्वासन
बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या मागील कपिलतीर्थ तलावात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर या परिसराचा सुरक्षित आणि सुशोभित विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी दिले आहे. यासाठी आपल्या निधीतून साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविवार दि. ३ मे रोजी कपिलतीर्थ तलावात झालेल्या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तलावालगतच्या घरांनाही तडे जाऊन माती ढासळण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर गोडसे कुटुंबीय आणि युवा समिती सीमाभागाच्या शिष्टमंडळाने आमदार राजू सेठ यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या विषयात कोणताही श्रेयवाद किंवा राजकारण न आणता कपिलतीर्थ तलावाचा सर्वांगीण विकास करणे हे आपले कर्तव्य आहे. तलाव परिसर सुरक्षित, विकसित आणि आकर्षक बनवण्यासाठी महापालिका प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
इतिहासप्रसिद्ध कपिलेश्वर व्यायामशाळा आणि परिसरातील समुदाय भवनाचाही विकास करण्यात येणार असून, येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले.
लवकरच जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून विकासकामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले तसेच गोडसे कुटुंबीयांच्या वतीने श्रीकांत गोडसे उपस्थित होते.







