बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या निर्मात्यांनी तयार केलेला ऑल इज वेल हा चित्रपट येत्या दि. २७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर सदर चित्रपटातील दिग्गज कलाकारांनी आज मंगळवारी बेळगावला भेट दिली. यावेळी बेळगावातील मराठी भाषिक जनतेने मराठा मंदिर येथे त्यांचे उत्साही स्वागत केले. प्रियदर्शन जाधव आणि योगेश जाधव दिग्दर्शित या चित्रपटात प्रसिद्ध बहुभाषिक कलाकार सयाजी शिंदे, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, नक्षत्र मेढेकर, सायली फाटक आणि अमायरा गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बहुभाषिक कलाकार सयाजी शिंदे यांनी अतिशय कौशल्याने अभिनय केला आहे आणि तरुण कलाकारांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय सुंदर चित्रपट तयार केला आहे. प्रत्येकाने थिएटरला भेट द्यावी, चित्रपट पहावा आणि ‘ऑल इज वेल’ला प्रतिसाद द्यावा. अभिनेता, निर्माते आणि लेखक प्रियदर्शन जाधव म्हणाले की, बेळगाव येथील वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन निर्मित ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होत आहे आणि लोकांनी तो पाहण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह सिनेमागृहात यावे.

यावेळी निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हलप्पावर, मल्लापा मरूचे, विनायक पट्टणशेट्टी, कार्यकारी निर्माते संजय ठुबे आणि निर्मिती नियंत्रक विनया जवळगीकर यांच्यासह आर. एम. चौगुले, अरुण कदम, मल्लेश मरुचे, अमित जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.