• भक्ती रसामृत स्वामी महाराज

बेळगाव : “श्रील प्रभूपादानी कठोर तपस्या करून सुरू केलेले इस्कॉनचे आंदोलन जगभर पसरले आहे. पूर्वी भक्तांची संख्या कमी होती आणि ते फक्त मंदिरात राहात होते. पण आता मंदिराबाहेर राहणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. ही चळवळ अशीच पुढे चालू ठेवण्याची व त्याला कोणतेही गालबोट न लागण्याची जबाबदारी यापुढे तरुण पिढीवर आहे” असे प्रतिपादन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना केले.

इस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी इस्कॉन चळवळीत”व्यास पूजा” म्हणून साजरा केला जातो. तो 130 वा अविर्भाव दिन यंदाही मोठ्या उत्साहाने रविवारी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्रील प्रभुपाद यांना आदरांजली वाहताना महाराज बोलत होते.

श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरा शेजारील पटांगणात उभारण्यात आलेल्या शामियाण्यात प्रभूपादांचा विग्रह ठेवण्यात आला होता. अतिशय सुंदर अशी आरास करण्यात आली होती.

सकाळी अभिषेक झाल्यानंतर प्रभु पादांच्या विग्रहाला महाराजांनी हार घालून नंतर अभिषेक केला, त्यानंतर दीक्षित भक्तांनी अभिषेक केले. पन्नास हून अधिक भक्तांनी प्रभुपादांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले आणि त्यांना पुष्पांजली वाहिली.

  • दहीहंडीचा कार्यक्रम

शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता मंदिराच्या आवारात लहान मुलांसाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल इस्कॉन तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.