- दागिने व मोबाईल लुटून मृतदेह उसाच्या शेतात पुरला
- तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कुलगोड पोलिसांची कारवाई
बेळगाव : कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता झालेल्या अन्नपूर्णा (वय ३४) यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. आर्थिक फायद्यासाठी ओळखीच्या महिलेची हत्या करून तिचे दागिने व मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ताब्यात घेतले. आरोपीने मृतदेह उसाच्या शेतात पुरल्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
अन्नपूर्णा बेपत्ता झाल्यानंतर कुलगोड पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कोल्हापूर येथील दिलीप गडकरी याच्यावर संशय आला. अन्नपूर्णा आणि दिलीप यांच्यात संपर्क असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत आर्थिक फायद्यासाठी अन्नपूर्णाची हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने तिच्याकडील सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन लुटला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात गुपचूप पुरल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्या केल्यानंतर आरोपी मृत महिलेचा मोबाईल फोन विकण्यासाठी मध्य प्रदेशात गेल्याची माहिती तपासात पुढे आली. मोबाईल विक्रीच्या प्रयत्नादरम्यान त्याला पोलिसांनी पकडले. मोबाईल फोनमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.








