• सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • मार्केट आणि एपीएमसी पोलिसांची स्वतंत्र कारवाई

बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. मार्केट आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अन्य एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने स्वीकार हॉटेल तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तपासणी मोहीम राबवली. यावेळी तलवार बाळगल्याचे आढळून आल्याने घी गल्ली येथील मोहम्मदबिलाल सफरराज पठाण याला पीएसआय हुसेन केरूर आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभवनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तन्वीर खासीमसाब सय्यद (रा. सत्यसाई कॉलनी) याच्याविरुद्ध पीएसआय विठ्ठल हावण्णवर यांच्या पथकाने अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

या दोन्ही कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्तांनी कौतुक केले.