• महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
  • म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने सादर केले निवेदन

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रलंबित असलेल्या मागण्यांना पुन्हा गती देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर कोल्हापूर येथे उच्चाधिकार मंत्रिमंडळ समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेऊन सीमाभागातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावात दाखल झालेल्या फडणवीस यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या पाठपुराव्याला गती देण्याबरोबरच कोल्हापूर येथे उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी करण्यात आली.

सीमाप्रश्न आणि मराठी भाषेबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी केलेल्या कथित वक्तव्याचाही निवेदनात निषेध करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती वकील अमर येळ्ळूरकर यांनी दिली.

शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनानंतर कोल्हापूर येथे उच्चाधिकार मंत्रिमंडळ समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच समन्वय मंत्रालय बेळगावला आणण्याच्या मागणीवरही सकारात्मक भूमिका दर्शविली. या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून सीमाभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतही प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या वक्तव्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत पुण्यातील समन्वयकांशी चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे किणेकर यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या ८ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. मात्र, त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे म. ए. समितीचे नेते रणजित चव्हाण-पाटील यांनी सांगितले. नागपूर अधिवेशनानंतर बैठक घेऊन सर्व प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचा इशारा समितीच्या नेत्यांनी दिला आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर आगामी काळात मंत्रालयासमोर आंदोलन छेडावे लागेल, असे वकील अमर येळ्ळूरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.