• ऊस आणि भात पिकांची नासधूस ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

खानापूर : तालुक्यात जंगली हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. निलावडे ग्रामपंचायत हद्दीतील कांजळे गावात गेल्या दोन दिवसांपासून नऊ जंगली हत्तींच्या कळपाने ठाण मांडले आहे. या कळपाने सुमारे ५० टन ऊस पिकाचे नुकसान करण्याबरोबरच कापून ठेवलेल्या भात पिकाचीही नासधूस केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

नेर्सा परिसरातून आलेल्या हत्तींच्या कळपाने कांजळे येथील शेतकरी रावजी मष्णू पाटील यांच्या शेतातील ऊस खाऊन आणि तुडवून मोठे नुकसान केले. तसेच शेतकरी मष्णू गावडा यांनी कापून ठेवलेले भात पीकही हत्तींनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. अचानक झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरम्यान, यापूर्वी आमदार विठ्ठल हळगेकर यांनी कांजळे परिसरातील ऊस पिकाची प्रथम तोडणी करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हत्तींच्या कळपाने अर्ध्याहून अधिक ऊस पिकाचे नुकसान करूनही या भागाकडे आमदारांनी पाठ फिरवल्याचा आरोप निलावडे ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी केला आहे.

लैला साखर कारखान्याने येत्या शनिवारपर्यंत ऊसतोडणी पथके पाठवून कांजळे परिसरातील ऊसतोड सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निर्धारित वेळेत ऊसतोड सुरू न झाल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.