- ८२ किलो ग्रीको रोमन वजन गटात पटकाविले तिसरे स्थान
- खानापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविला
खानापूर : धारवाड येथील जेएसएस कॉलेज, विद्यागिरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खानापूर तालुक्यातील गुंडपी गावचा युवा कुस्तीपटू श्रवण मर्याप्पा पाटील याने उल्लेखनीय यश संपादन केले. ८२ किलो ग्रीको रोमन वजन गटात तिसरे स्थान मिळवत त्याने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
कर्नाटक सरकारच्या राज्य पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रवणने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत राज्यस्तरावर यश मिळविले. तो चंद्रगी येथील एसपीडीसीएल महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गुंडपी गावासह संपूर्ण खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्रवणला महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील तसेच कुस्ती प्रशिक्षक मंजुनाथ टी. आणि रवी केंपणावर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामागे त्याचे वडील मर्याप्पा पाटील यांचे प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले. मर्याप्पा पाटील हे खानापूरमधील श्रवण ट्रेडर्सचे मालक असून, टाइल्स व्यवसायात त्यांची ओळख आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या श्रवणने राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवून आपल्या मेहनतीचे आणि जिद्दीचे दर्शन घडविले आहे. त्याच्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांमध्येही तो अशीच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








