- बेळगावमध्ये सीसीबी पोलिसांचा छापा ; चार तरुणींची सुटका
- मालक आणि व्यवस्थापक ताब्यात
बेळगाव : शहरातील आरपीडी क्रॉस परिसरातील सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश केला. ‘डिव्हाईन सलून अँड स्पा’ येथे छापा टाकून पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली असून, स्पाचा मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे.
विश्वसनीय माहितीच्या आधारे सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान गुजरात आणि मुंबईसह राज्याबाहेरील चार तरुणी आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली.
या प्रकरणी स्पाच्या मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपींसह संबंधित कागदपत्रे टिळकवाडी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, टिळकवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.








